युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही – चंद्रकांत पाटील

0
349

मुंबई, दि. २० (पीसीबी) –  भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याचे सांगितले आहे. भाजपाची निवडणूक समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी १०० टक्के युती होईल, मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही असे सांगितले आहे. तसेच युतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच भाजपा आणि शिवेसना युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे. २२ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत असून यावेळी युतीची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांना मात्र याबाबत अधिकृतपणे काही सांगितले नाही. युतीची जेव्हा घोषणा होईल तेव्हा सोबत जो कोणी केंद्रीय मंत्री असेल ते पत्रकार परिषदेत असतील असे त्यांनी सांगितले.

दरम्यान शिवसेना-भाजपामध्ये १२६-१६२ जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याचंही सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिवसेना १२६ जागांवर लढणार असून, भाजपा आणि मित्रपक्षांसाठी १६२ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे.