या मालिकेतील कोणतं पात्र आता बदलतंय ?

0
364

मुंबई, दि.६(पीसीबी) : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्व मनोरंजन क्षेत्रातली चित्रीकरण बंद केली होती. परंतु, चाहत्यांसाठी आता खुशखबर आहे. झी मराठी वरील “माझ्या नवऱ्याची बायको” ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. राधिका, गुरुनाथ आणि शनाया या तिकडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ,चाहत्यांना आता एक सुखद धक्का मिळणार आहे. मालिकेतील जुनी शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील आता पुन्हा एकदा मालिकेत परतणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

रसिकाने साकारलेल्या ‘शनाया’ ला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. परंतु दीड वर्षांपूर्वी फिल्म मेकिंगच्या शिक्षणासाठी रसिकानं मालिका सोडली. पुढील शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली. मात्र, रसिकाने मालिका सोडल्यानंतर अनेक प्रेक्षकांचा विरस झाला. परंतु, आता ती पुन्हा एकदा पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

अभिनेत्री इशा केसकर सध्या शनायाचं पात्र साकारत असून तीचा अभिनयदेखील सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. परंतु, आता पुन्हा मालिकेत शनाया साकारण्यासाठी रसिका तयार असल्याची माहिती समोर आली आहे.