`या` पुढाऱ्यांसाठी वेगळा कायदा आहे काय ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
294

आपल्या देशात कायदे दोन प्रकारचे असावेत असे वाटते. धनंजय मुंडे यांची तीन बायकांची भानगड गाजली. संजय राठोड यांचे पूजा चव्हाण प्रकरण गेले १५ दिवस चर्चेत आहे. दोन्ही प्रकरणे गंभीर आणि अतिशय संवेदनशील. प्रत्यक्षात आजवर काहीच झाले नाही. सामान्य माणसाच्या बाबतीत असे झाले असते तर आजवर त्याला कोठडीत डामले असते. इथे अब्रुचे खोबरे झाले तरी चेहऱ्यावरची रेष हालली नाही. कारण कायदे पुढाऱ्यांसाठीचे वेगळे आहेत. तमाम राजकारणी, राजकीय पक्ष नेते, मंत्रीगण सगळेच निगरगट्ट झालेत. दुसरा किस्सा कोरोनाचा प्रसार होतो आहे म्हणून काही मान्यवरांनी आपले सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जाहीर आवाहन केले. राज्यातील मेळावे, समारंभ, जत्रा, यात्रा सर्व बंद केले. मंत्री संजय राठोड हे पोहरा देवीच्या दर्शनासाठी आले तेव्हाची गर्दी हासुध्दा सरकारच्या आदेशाला हरताळ फासण्याचाच प्रकार होता. इथे गर्दी करणाऱ्यांवर कारवाई होणार का, तिथेही कायदा वेगळाच आहे. मास्क वापरा, गर्दी करू नका, सोशल डिस्टंन्सिंग पाळा असे घसा ताणून सांगितले. अन्यथा पुन्हा लॉक डाऊन करावा लागेल, असा इशाराही दिला. प्रत्यक्षात राज्याच्या प्रमुखांचा आदेश पिंपरी चिंचवड शहरात खुद्द महापौरांसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी धाब्यावर बसवला आणि भरगच्च सभागृहात रॅम्प वॉक केला. उपस्थितांची तोबा गर्दी होती. स्टेजवरच्या मान्यवरांसह एकानेही मास्क घातला नव्हता. सॅनिटायझरची सोय नव्हती. दुसरीकडे पोलिस आणि महापालिकेचे कर्मचारी पूर्ण शहरात रस्ते व चौकांतून मास्क न वापरणाऱ्यांकडून जोरदार कारवाई सुरू होती. किती विसंगत चित्र आहे. कारण जनतेसाठी कायदा आहे, पुढाऱ्यांसाठी तो वेगळा आहे किंवा नाहीच्या बरोबर आहे.

कोरोनाच्या प्रसाराला हेच जबाबदार –
कोरोनाचे रुग्ण शहरात झपाट्याने वाढत आहेत. पुणे शहर व जिल्हा, पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाचा प्रसार पहिल्या सारखा जोमात आहे. रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली. तिकडे विदर्भात ५ जिल्हे आठवडाभरासाठी लॉकडाऊन करण्याची वेळ आली. मुंबईत ३५० इमारती सील केल्या. कोल्हापूरात २७ मंगल कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या. औरंगाबाद मध्ये सर्व शाळा महाविद्यालयांना पुन्हा टाळे ठोकावे लागले. कोरोनाची लस घेतलेली असताना नागपुरात ५, औरंगाबादला २ आणि पिंपरी चिंचवड मधील एका डॉक्टरांना पुन्हा कोरोना झाला. हे चित्र फारसे चांगले नाही. राज्यातील बदलते वातारवण अधिक बिघडू नये यासाठी सरकार दिवसरात्र प्रयत्न करताना दिसते. प्रत्यक्षात अशा परिस्थितीत राजकीय मतभेद बाजुला ठेवून लोकप्रतिनिधीनी कितीतरी जबाबदारीने वागले पाहिजे. तेच बेताल वागत असतात, पण त्यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही. कारण कायदे पुढाऱ्यांसाठी वेगळे आहेत. पिंपरी चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरां नीच ताळतंत्र सोडले आणि रॅम्प वॉक केला. इतर वेळी त्यांच्या उत्साहीपणा समजू शकतो. किमान कोरोना प्रसाराचे गांभिर्य ओळखून त्यांना हे टाळता आले असते. तसे झाले नाही म्हणून सर्व माध्यमांनी बातम्यांतून त्यांचा पंचनामा केला. आता त्यांच्या विरोधकांनीही हीच संधी साधून महापौर माई ढोरे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.

महापालिका आयुक्त राजेश पाटील हे फेसबूक लाईव्ह मध्ये एकीकडे लोकांना कोरोना प्रसार रोखण्यासाठी काय करा काय करू नका हे सांगत असताना बरोबर दुसरीकडे शहराच्या महापौर आणि १०-१५ भाजपा नगरसेविका, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा या रॅम्प वॉक करतात. लोकांना हे रुचलेले नाही. भाजपाच्या मंडळींना दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, पण स्वःताच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, असे म्हणावे लागते. मुळात प्रश्न असा आहे की, जे पोलिस अथवा महापालिका कर्मचारी सामान्य लोकांवर मास्क घातला नाही म्हणून कारवाई करतात ते या कार्यक्रमाला उपस्थितांवर कारवाई करणार आहेत का. प्रशासनाने हे धाडस दाखविले तर आम्ही समजू कायदा सर्वांसाठी सारखा आहे, अन्यथा कायदा पुढाऱ्यांसाठी वेगळा आहे, या जनमताला अधिक पुष्ठी मिळेल.

कृष्ण प्रकाश आणि राजेश पाटील यांची खरी कसोटी –
बाजारपेठा, मंडई, मॉल्स, थिएटर, प्रार्थना स्थळे, मैदाने सर्वत्र आजही तुफान गर्दी आहे. पुढाऱ्यांना नाहीच पण लोकांनाही आजसुध्दा परिस्थितीचे गांभिर्य नाही. दुचाकीवर दोन नव्हे तीन-तीन बसून जातात. चोर चाकीमध्ये चार नव्हे पाच जण बसतात. रिक्षांतून दोन प्रवाशी वाहण्याची परवानही असते, प्रत्यक्षात कोंबून कोंबून पाच-सहा प्रवासी असतात. पिंपरीची बाजारपेठ हाऊसफूल्ल असते. एकही दुकानदार आता सॅनिटायझर ठेवत नाही. हॉटेल, खानावळी, रेस्टॉरंट मध्ये तुडूंब गर्दी असते. शहरात होणारे लग्न सोहळे पाहिले तर किमान हजार बाराशे लोक असतात. जेवणाच्या पंगतीला शेजीर शेजारीच बसतात. सर्व मंदीरांतून रांगा असतात. मोरया गोसावी मंदिरात गणेश चतुर्थिला लांबच लांब रांगा पुन्हा सुरू झाल्यात. शिवजयंतीला गर्दीचा महापूर लोटला होता. महापालिका सभागृहात सर्वसाधारण सभेला नगरसेवकांची राडेबाजी झाली तेव्हा झोंबाझोंबीचे चित्र पाहिले. एकानेही मास्क घातलेला नव्हता. लोकांना ब्रम्हज्ञान शिकविताना स्वतः सगळे कोरडे पाषाण आहेत. पुन्हा कोरनाचे तेच संकट घोंगावते आहे. परिस्थिती बिघडली तर सुरू झालेले उद्योगधंदे आता पार कोसळून पडतील. अराजक माजेल, बेरोजगारी वाढेल आणि या सर्व परिस्थितीला हे बेजबाबदार पुढारी असतील. भले कायदे यांचंयासाठी वेगळे असतील पण कोरोनाच्या लेखी सर्व समान आहे हे लक्षात ठेवा. गरिब, श्रीमंत, उच्च-निच्च, जात भाषा धर्मा असा भेद कोरोनाच्या लेखी नाही. त्यामुळे पुढारीसुध्दा कोरोनाच्या दरबारात खिसगणतीत आहेत. आता खरे तर शहरातील दोन प्रशासन प्रमुखांची कसोटी आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कायदा सगळ्यांना सारखा आहे हे दाखवून द्यावे. अन्यथा आता लोकांनाची धाडस करून दंड करणाऱ्यांना हा जाब विचारला पाहिजे.