‘या’ खेळाडूच्या अर्धशतकी खेळीने, भारत सावध सुरवात करत एक पाऊल पुढे

0
166

सिडनी,दि.०९(पीसीबी) – स्टिव स्मिथची जिगरबाज शतकी खेळीचे महत्व तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा आणि शुभमन गिल यांच्या कामगिरीसमोर काहिशी फिकी पडली.

स्मिथच्या लढाऊ शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३८ धावांची मजल मारता आली. दुसऱ्या दिवशी स्मिथ लढत असताना भारताकडून रवींद्र जडेजाने चार गडी बाद करताना ऑस्ट्रेलियाचा डाव मर्यादित ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर गिलच्या सफाईदार अर्धशतकी खेळीने भारताने दुसऱ्या दिवस अखेरीस २ बाद ९६ अशी सावध सुरवात करताना एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न केला.

डावखुरा फिरकी गोलंदाज जडेजा (४-६४) आणि जसप्रित बुमरा (२-६६) यांच्या प्रयत्नांमुळे ऑस्ट्रेलियाला मोठा मजल मारता आली नाही. स्मिथ आणि लाबुशेन खेळत असताना ऑस्ट्रेलियाला चारशेची मजल खुणावत होती. पण, एकवेळ २ बाद २०६ अशा सुस्थितीत असणारा ऑस्ट्रेलियाचा डाव अखेर ३३८ धावांत आटोपला. स्मिथच्या खेळीला पूर्णविराम देताना जडेजाने केलेला थ्रो केवळ अप्रतिम होता. त्याच्या थेट फेकीने स्मिथ धावबाद झाला आणि त्याच्यासह ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आला.

भारताच्या डावाला रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आत्मविश्वासाने सुरवात केली. गिलची फलंदाजी ही एखाद्या अनुभवी फलंदाजासाठी सफाईदार होती. रोहितही चांगला खेळत होता. मात्र, हेझलवूडने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर टिपले. त्यानंतर पॅट कमिन्सने गिलची विकेट मिळविली. त्यानंतर दिवस अखेरीस अजिंक्य रहाणे (५) आणि चेतेश्वर पुजारा (९) यांनी भारताचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.