…या कारणासाठी अशोक चव्हाण लोकसभा लढवणार नाहीत

0
1670

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – काँग्रेसचे नांदेडमधील खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आगामी लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याची  माहिती समोर आली आहे. राज्यात २०१९ मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास अशोक चव्हाण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असू शकतात. त्यामुळेच चव्हाण लोकसभेऐवजी विधानसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात काँग्रेसने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेचे नेतृत्व अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. त्यामुळे  २०१९मध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा  चेहरा अशोक चव्हाण असण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अशोक चव्हाण यांनी विजय मिळवला होता.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आजपासून १७ तारखेपर्यंत तीन दिवस टिळक भवन या पक्षाच्या मुख्यालयात बैठक  आयोजित केली आहे. यावेळी राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.