Maharashtra

…या कारणामुळे मोदी,जेटलींसोबत एकही अर्थतज्ञ काम करण्यास तयार नाही – पृथ्वीराज चव्हाण

By PCB Author

December 17, 2018

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – नोटाबंदी, जीएसटीसारख्या आत्मघातकी निर्णयामुळे देशाला धक्का बसला आहे. आरबीआय, सीबीआय आणि संसद या संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. सध्याच्या घडीला पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबत जागतिक दर्जाचा एकही अर्थतज्ञ काम करण्यास तयार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद येथे  परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत   पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.  यावेळी ते म्हणाले की, राफेल खरेदीतील ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार हाच आमचा आगामी निवडणुकीत प्रचाराचा  प्रमुख मुद्दा असणार आहे.  राफेल विमान खरेदी व्यवहारात फ्रान्सच्या कंपनीला ४० हजार कोटी रुपये अतिरिक्त कशासाठी दिले, याचे उत्तर सरकारने द्यावे, असे चव्हाण म्हणाले.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली आहे. त्यामुळेच राफेल भ्रष्टाचार प्रकरणाविरोधातील याचिका फेटाळण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे या सरकारला क्‍लीनचीट मिळाल्याचा अर्थ होत नाही. सर्वोच्च न्यायालयाला खोटी माहिती कुणी दिली,  याची चौकशी केली पाहिजे, असेही  चव्हाण  म्हणाले.