Maharashtra

…या कारणांमुळे दीपक केसरकरांनी शरद पवारांची भेट घेणे टाळले

By PCB Author

December 04, 2018

सावंतवाडी, दि. ४ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांची भेट घेणार होतो. मात्र, अचानक मुंबईला जावे लागल्याने पवारांची भेट घेऊ शकलो नाही, असे सिंधूदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी  आज (मंगळवार) येथे सांगितले.

पत्रकार परिषदेत केसरकर यांना शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भेटीबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, शरद पवार यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांची भेट घेणार होतो. तसेच  राजकीय मतभेद असले तरी आदरातिथ्य करणे गरजेचे आहे. त्यांच्या फोनवर संपर्क साधला होता. तसेच  भेटण्याबाबत बोललो होतो. मात्र अचानक मुंबईत बैठक असल्यामुळे त्यांच्याशी भेटू शकलो नाही, असा त्यांनी खुलासा केला.

दरम्यान, शरद पवार यांनी नारायण राणे यांची सोमवारी कणकवली येथील घरी भेट घेतली होती.  मी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर   असताना राणेंनी मला फोन केला.  ते आमचे जुने सहकारी आहेत’,  म्हणून मुंबईला जाता जाता त्यांची भेट घेतली, असा खुलासा पवारांनी केला होता. तर या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.