Maharashtra

यावेळी मोदींची हवा नाही, नवनीत राणा यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ

By PCB Author

April 17, 2024

अमरावती : ‘‘ही निवडणूक आपल्‍याला ग्रामपंचायत सारखी लढवावी लागेल, आपले जेवढे मतदार आहेत ते सर्व बुथपर्यंत गेले पाहिजे, जर कुणी फुग्‍यात राहत असेल, की मोदींची हवा आहे, तर तुम्‍ही लक्षात ठेवा मी २०१९ मध्‍ये अपक्ष म्‍हणून निवडून आली होती. एवढी मोठी यंत्रणा असूनही एक अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो, त्‍यामुळे कार्यकर्त्‍यांनी भ्रमात राहू नये’’, असे वक्‍तव्‍य भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांनी एका प्रचार सभेत केल्‍यानंतर त्‍यावर विविध स्‍तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्‍या आहेत.

नवनीत राणा यांच्‍या वक्‍तव्‍यामुळे भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये नाराजीचा सूर उमटल्‍याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, विरोधकांना आयते कोलीतच मिळाले आहे. विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या प्रचार सभेतच मोदींची हवा नसल्याचे स्पष्ट केले आहे. नवनीत राणा यांना वस्तुस्थिती समजलेली आहे. परंतु उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र हे समजलेले नाही, ते अजूनही हवेतच आहेत, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. देशातील संविधानिक संस्‍थांचा कितीही गैरवापर केला तरी भाजपचा पराभव अटळ आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना त्याची जाणीव झाली, तशीच नवनीत राणा यांनाही झाली आहे, असे अतुल लोंढे यांनी म्‍हटले आहे.

खासदार नवनीत राणा यांनी मंगळवारी एक चित्रफीत प्रसारीत करून आपल्‍या वक्‍तव्‍याचा विपर्यास करण्‍यात आल्‍याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या कार्यामुळे देश प्रगतीपथावर आहे. आम्‍ही त्‍यांच्‍या नावावरच लोकांकडे मत मागत आहोत. मोदी यांच्‍या कार्यकाळात झालेल्‍या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्‍याचे काम भाजपची एक उमेदवार म्‍हणून मी करीत आहे. पूर्ण देशात त्‍यांच्‍यासमोर एकही विरोधक नाही. नरेंद्र मोदी यांची हवा होती, आताही आहे आणि भविष्‍यातही राहणार आहे, असे निवेदन नवनीत राणा यांनी केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याविषयी देखील विरोधकांनी आपले एक वक्‍तव्‍य संपादित करून त्‍याचा विपर्यास करण्‍याचा प्रयत्‍न केला. ते वक्‍तव्‍य आपण आमदार बच्‍चू कडू यांना उद्देशून केले होते, असे स्‍पष्‍टीकरण नवनीत राणा यांनी दिले आहे. आमदार रवी राणा यांना भाजपमध्‍ये प्रवेश करायचा किंवा नाही, याविषयी ते निर्णय घेतील. खरे तर नवरा-बायकोच्‍यामध्ये कुणी न बोललेले बरे, असा टोला नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी लगावला होता. त्‍यावरूनही वाद निर्माण झाला होता.