Desh

यांचा आदर्श घ्या! राज्यघटनेची शपथ घेत बांधली लग्नगाठ; रिसेप्शनऐवजी भरवले रक्तदान शिबीर

By PCB Author

October 23, 2019

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) –  लग्न करायचे म्हटले की अनेकदा लाखो रुपये खर्च केले जातात. लग्न थाटामाटात झाले पाहिजे असा हट्ट प्रत्येकाचाच असतो. म्हणून मग हळदीपासून ते वरातीपर्यंत सगळीकडे पाण्याप्रमाणे पैसा खर्च केला जातो. पण ओदिशामध्ये एका दांपत्याने समाजासमोर आदर्श उदहारण ठेवले आहे. या दांपत्याने राज्यघटनेची शपथ घेत लग्नगाठ बांधली. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या लग्नानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केले होते. हे लग्न सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

ओदिशामधील बेरहामपूर येथे बिप्लब कुमार आणि अनिता यांचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी त्यांनी राज्यघटनेची शपथ घेत लग्नगाठ बांधली. लग्नानिमित्त बिप्लब कुमार आणि अनिता यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यावेळी त्यांनी स्वत:देखील रक्तदान केले.

“प्रत्येकाने हुंडा घेणे टाळले पाहिजे. साध्या पद्धतीने लग्न करण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे फटाके तसेच मोठ्या आवाजात गाणी वाजवणे टाळता येते. आम्ही आमच्या लग्नात वरातदेखील ठेवली नाही. त्याऐवजी रक्तदान शिबीर आय़ोजित केले. प्रत्येकाने रक्तदानासारखे सत्कार्य केले पाहिजे,” असे बिप्लब कुमार याने सांगितले आहे. अनिताच्याही याच भावना असून तिने आपल्या आयुष्याची एका वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

“रक्तदानासारखे चांगले काम करत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केल्याचा मला आनंद आहे. आमच्या लग्नात विधवा महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. इतरांनी यामधून प्रेरणा घेतली पाहिजे असे आम्हाला वाटते,” असे अनिता यांनी सांगितले आहे.