Maharashtra

‘यशस्वी’ भव! पाणीपुरी विकणारा मुंबईकर भारताच्या अंडर १९ संघात

By PCB Author

July 04, 2018

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – घरची परिस्थिती हलाखीची, वडिलांचे एक दुकान, पण कुटुंबातील दोन मुले आणि पत्नीला सांभाळता येईल इतके यांचे उत्पन्न नव्हते.. अशा स्थितीत यशस्वी त्याचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला… मैदानातील ग्राऊंड्समनच्या तंबूत राहून आणि पोटाची खळगी भरण्यासाठी पाणीपुरी विकून तो दिवस ठकलत होता…तर दुसरीकडे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरूच होती.. अखेर १७ वर्षांच्या यशस्वी जयस्वालला त्याच्या मोहनतीचे फळ मिळाले असून भारताच्या अंडर १९ संघात त्याची निवड झाली आहे.

मूळचा उत्तर प्रदेशमधील भदोही गावचा रहिवासी असलेला यशस्वी जयस्वालची भारताच्या अंडर १९ संघाच्या श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे. यामुळे यशस्वी सध्या आनंदात आहे. मधल्या फळीतील फलंदाज म्हणून यशस्वी मैदानात उतरतो. हा दौरा यशस्वीसाठी महत्त्वाचा आहे. क्रिकेटच्या मैदानातील कारकिर्दीची ही त्याची सुरुवात असली तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास तितका सोपा नव्हता. त्याचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

यशस्वीच्या वडिलांचे भदोहीत एक छोटे दुकान आहे. यशस्वीला लहानपणापासूनच क्रिकेटपटू व्हायचे होते. त्याच्या वडिलांचा याला विरोध नव्हता. मात्र, आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यााठी यशस्वी मुंबईत आला. वरळीत त्याचे काका संतोष यांच्या घरी तो राहत होता. मात्र, ते घर छोटे असल्याने संतोष यांनी यशस्वीला मुस्लीम युनायटेड क्लबच्या मालकांकडे नेले. त्याला तंबूत राहू द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.