Pune

एल्गार परिषद प्रकरण: पाच संशयितांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना दिला ९० दिवसांचा कालावधी

By PCB Author

September 02, 2018

पुणे, दि. २ (पीसीबी) – माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले संशयित सुधीर ढवळे, सोमा सेन,रोना विल्सन,सुरेंद्र गडलिंग,महेश राऊत यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसाची मुदतवाढ आज (रविवार) पुणे न्यायालयाने पोलिसांना दिली आहे.

सुधीर ढवळे, सोमा सेन,रोना विल्सन,सुरेंद्र गडलिंग,महेश राऊत या पाच संशयितांच्या विरोधात तपास करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची वाढ मिळावी, असा अर्ज पुणे पोलिसांनी आज न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश के. डी. वडणे यांनी ९० दिवसाची मुदत वाढ देण्याचा निर्णय दिला. सरकारी वकील उज्जवला पवार आणि बचाव पक्षाकडून सिद्धार्थ पाटील आणि रोहन नहार यांनी युक्तिवाद केला. तर, भीमा कोरेगाव प्रकरणासारखी परिस्थिती कायम ठेवण्यासाठी महेश राऊत याच्याकडून ५ लाख रुपये पुरवण्यात आले होते, अशी माहितीही पोलीस सहायक आयुक्त शिवाजी पवार यांनी न्यायलयात दिली.