Pimpri

यमुनानगर रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर, नर्सचे कामबंद आंदोलन; दोन महिन्यापासून मिळाला नाही पगार..

By PCB Author

January 11, 2022

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यमुनानगर झोनमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणा-या डॉक्टर, स्टाफनर्स अशा 35 कर्मचा-यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या कर्मचा-यांना ठेकेदाराने दोन महिन्यापासून पगार दिला नाही. कोरोनाची तिसरी लाट सुरु असताना कोरोना योद्धा असलेल्या डॉक्टर, नर्सला वेतनासाठी काम बंद करावे लागले आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्यासाठी ठेकेदार नेमले. त्यांच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यास सुरुवात केली. निगडी, यमुनानगर झोनमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने 35 लोक काम करत आहेत. 11 डॉक्टर, स्टाफनर्स यांचा समावेश आहे. या 35 कर्मचा-यांचा नोव्हेंबर 2021 पासूनचा पगार झाला नाही. दररोज नवीन तारीख सांगितली जाते. पण, 11 जानेवारी आली तरी पगार झाला नाही. फोन केला तर उद्धटपणे उत्तरे दिली जातात. कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली जाते, असा आरोप कर्मचा-यांनी केला. 11 डॉक्टर, स्टाफ नर्स, एनएम, डेटा एंट्री ऑपरेटर अशा 35 कर्मचा-यांनी आजपासून कामावर जाणे बंद केले. जोपर्यंत पगार होत नाही. तोपर्यंत कामावर जाणार नसल्याचे एका कर्मचा-यांने सांगितले.

लसीकरण केंद्राची आमच्यावर जबाबदारी आहे. ओपीडीही आम्ही बघतो. टेस्टिंगचे कामही आम्हीच करतो. जीव धोक्यात घालून काम करत असताना नोव्हेंबरपासून आमचा पगार झाला नाही. ठेकेदारावर पालिकेचे काहीच नियंत्रण नाही. पगार झाला नसल्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना पत्र दिले. पण, त्यांनी पत्रही स्वीकारले नसल्याचे डॉक्टरने सांगितले. याप्रकरणाची माहिती घेऊन संबंधितांना सूचना दिल्या जातील, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.