यमुनानगर मधून आयशर टेम्पो चोरीला

0
238

निगडी, दि. १३ (पीसीबी) – वाहन चोरांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. शहरात वाहनचोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून दुचाकी वाहनांसह अवजड वाहने देखील चोरटे चोरून नेत आहेत. यमुनानगर निगडी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी आयशर टेम्पो चोरून नेला आहे. तसेच एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत.

तुकाराम शिवाजी निकम (वय 25, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी आयशर टेम्पो चोरीबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी निकम हे त्यांचे मामा वाल्मीक हनुमंत कवर यांचा आयशर टेम्पो (एम एच 14 / एच यु 1463) चालवतात. त्यांनी आयशर टेम्पो सोमवारी (दि. 10) दुपारी यमुनानगर निगडी येथील एसपीएम शाळेच्या गेट बाहेरील रस्त्याच्या बाजूला पार्क केला. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांचा साडेआठ लाख रुपये किमतीचा टेम्पो चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 11) सकाळी उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

प्रशांत दशरथ साळुंखे (वय 28, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 17 / ए एल 5900) मंगळवारी (दि. 11) सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एमआयडीसी भोसरी मधील जनरल इंडस्ट्रियल कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या पार्किंग मधून चोरीला गेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

रविकांत बाळासाहेब वाघमारे (वय 31, रा. बावधन खुर्द) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघमारे यांची 25 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 12 / जे एक्स 2136) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरापासून चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 11) सकाळी उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.