यंदा लालबागचा राजा गणेश मंडळाचा असा होणार आगळा वेगळा उत्सव

0
915

मुंबई, दि. १ (पीसीबी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील अनेक गणेशोत्सव मंडळांनी लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मंडळांनी उस्तव रद्द करण्याचा, काहि मंडळांनी थेट माघी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय केला आहे. मात्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यत्सव साजरा करण्यावर मंडळाच्या बैठकीत एकमत झाले आहे. “यंदा राजाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार नाही,” असं सांगत लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. श्री गणेश मूर्तीची स्थापनाच होणार नसल्यामुळे यंदा लालबागचा राजाच्या दर्शनाला कोट्यवधी भाविकांना मुकावं लागणार आहे.

११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर असतानाच राज्यासमोर असणारे कोरोनाचे संकट लक्षात घेता मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनला येतात. कोरोनाच्या काळात ही गर्दी टाळण्यासाठी मंडळाने यंदा मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर आधीच बराच ताण आहे. त्यात गणेशोत्सवामुळे होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये या दृष्टीने खबरदारी म्हणून मंडळानेच पुढाकार घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रक्तदान आणि प्लाझमा थेरपी उपक्रम मंडळामार्फत राबवण्यात येणार आहे.
नवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. मागील ८६ वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मूर्ती विराजमान होते. अनेक वर्षांपासून राजाची १४ फुट उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून येतात. मात्र यंदा कोरोनामुळे उत्सवाऐवजी रक्तदान शिबिरं आणि प्लाझमा थेरपी शिबिरं राबवण्यात येणार आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र अगदी साध्यापद्धतीने आणि समाजभान राखत मंडळाने उत्सव साजरा न करण्याला प्राधान्य दिलं आहे.
दरम्यान, पुणे शहरातील मानाच्या पाच गणेश मंडळांनीसुध्दा यावेळी अत्यंत साधेपणाने उत्तसव साजरा करायचे ठरवले आहे. अन्य लहान मोठ्या मंडळांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत उत्सव साधेपणाने करायचा निर्णय घेतला आहे. गणेश चतुर्थीची अथवा अनंत चतुरर्थीला विसर्जन मिरवणूक काढायची की नाही त्याबाबतचा निर्णय अद्याप बाकी आहे. कोरोनाचा पुणे शहरातील प्रसार पाहता देखावे, सजावट अथवा मिरवणुकांचे धाडस कोणी करेल असे दिसत नाही. पिंपरी चिंचवड मधील प्रमुख मंडळांना मुख्यमंत्री सहाय निधीकडे रक्कम वर्ग करायचे ठरविले आहे.