यंदा पावसाची प्रतीक्षा; मराठवाडा, विदर्भात कमी पाऊस   

0
792

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणखी चार दिवस अधिक झळा सोसाव्या लागणार आहेत. कारण नैऋत्य मोसमी मान्सूनचे यंदा १ जून ऐवजी ४ जूनला भारतात आगमन होणार आहे, अशी माहिती स्कायमेट या खासगी अभ्यास करणाऱ्या संस्थेने दिली आहे. त्याचबरोबर  महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस पडेल, अशी शक्यताही स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन सिंह यांनी वर्तवली आहे.

यावर्षी देशाच्या सर्व चार भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल. पूर्व, ईशान्य आणि मध्य भारतात उत्तर पश्चिम भागात आणि दक्षिणेला कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  २२ मे रोजी मान्सून अंदमान निकोबार द्वीपसमूहापर्यंत पोहोचू शकतो.  २०१८ सालीही मान्सून समाधानकारक नव्हता. १२ क्षेत्रात दुष्काळी परिस्थिती  निर्माण झाली आहे.

यावर्षी देशातील मान्सून अल निनोच्या प्रभावाखाली राहणार आहे.  तसेच जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता  आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरिस केरळमध्ये मान्सून दाखल होतो. परंतु यावेळी केरळमध्येही ४ जून रोजी मान्सून दाखल होणार असल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.  यातच कर्नाटक, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेशातील आणि गुजरातमधील काही भागांमध्ये कमी पावसाची शक्यता  आहे. तसेच देशभरात सरासरीच्या ९३  टक्के पाऊस पडेल,  असा ठाम  अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.  तसेच बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये यावेळी कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.