यंदाची निवडणूक विरोधकांसाठी प्रतिकूल परिस्थितीची – शरद पवार

0
320

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याही परिस्थितीत  सत्ता आपल्याच  हातात  कायम ठेवण्यासाठी सर्व प्रकारचा खटाटोप  सुरू आहे.  विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सीबीआय, ईडी यांसारख्या संस्थांचा वापर केला जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक थोडीफार विरोधकांसाठी प्रतिकूल परिस्थितीची आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. 

पवार म्हणाले की, कधी नव्हे ते या निवडणुकीच्या वेळी फोन-टॅपिंगचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत आम्हाला मदत करा, असे जरी कोणी कोणाशी बोलले; तरी संध्याकाळी त्यांच्याकडे ‘ईडी’चे पथक दाखल होते. अमाप साधनसंपत्तीचा वापर सत्ताधाऱ्यांकडून सध्या केला जात आहे. पण विरोधकांना मात्र या सर्वांबाबत कशाप्रकारे मर्यादित ठेवले जाईल, याची काळजी घेतली जात आहे.

लोकसभा निवडणूक भाजपकडून आक्रमकपणे लढवली गेली. राष्ट्रसुरक्षेच्या मुद्याचा गवगवा करून निवडणूक लढवण्यात आली. देशाच्या संरक्षणाचे मुद्दे हे केवळ एका पक्षाचे नसतात. सगळा देश यात समाविष्ट असतो. मात्र आज मुद्दाम असे प्रश्न निर्माण करून त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी व विरोधकांना नाऊमेद करण्यासाठी या मुद्द्यांचा वापर केला जात आहे, असे पवार म्हणाले.