…म्हणून हॅटट्रीक घेऊन देखील मोहम्मद शमीऐवजी जसप्रीत बुमराहला मिळाला सामनावीरचा पुरस्कार

0
482

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – विश्वचषकातील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा ११ धावांनी  पराभव केला आहे. या सामन्यांत हॅटट्रीक घेऊन देखील सामनावीर पुरस्कार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला न मिळता जसप्रीत बुमराहला मिळाल्याने क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या असून  सोशल मीडियावर याची प्रचंड चर्चा आहे.

शमीने त्याच्या ९.५ षटकात ४० धावा देऊन ४ गडी बाद केले, तर बुमराहने ३९ धावा देऊन केवळ २ फलंदाज माघारी धाडले. त्यानंतर सोशल मीडियावर याबाबत नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत. अनेकांनी शमीवर अन्याय झाला असून तोच खरा मॅन ऑफ द मॅच होता, असे म्हटले आहे.

मोहम्मद शमीने जरी हॅटट्रीक घेऊन एकूण ४ विकेट घेतल्या, तरी सामन्याचे चित्र पालटण्यामध्ये बुमराहची गोलंदाजी महत्त्वाची ठरली.  अफगाणिस्तानचा संघ केवळ दोन गडी बाद १०६ धावा अशा भक्कम स्थितीत होता. त्यावेळी बुमराहने आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये  खेळपट्टीवर जम बसलेल्या अफगाणिस्तानच्या दोन्ही फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडले.  सर्वप्रथम रमहत शाह याला उसळत्या चेंडूवर आणि दुसऱ्या चेंडूनंतर हश्मतुल्लाह शाहिदी यालाही बाद केले आणि सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले.

सामनावीर पुरस्कार देताना शक्यतो सामन्याला कलाटणी देणाऱ्या खेळाडूचा विचार केला जातो. बुमराहने एकाच षटकात दोन हादरे दिल्यानंतर पुन्हा अफगाणिस्तान संघाची फलंदाजी सावरू शकली नाही, त्यांचा एकही फलंदाज मैदानावर तग धरु शकला नाही. याशिवाय ४९ व्या षटकात १२ चेंडूंमध्ये २१ धावा आवश्यक असताना बुमराहने केवळ ५ धावा दिल्या. यामुळे बुमराहला सामनावीरचा पुरस्कार दिला.