‘…म्हणून संजय राऊत अ‍ॅक्शन मोडमध्ये, संजय राऊतांची पुण्यात मोर्चेबांधणी’; पदाधिकाऱ्यांशी जोरबैठकांना सुरुवात

0
345

पुणे, दि.१३ (पीसीबी) : जिल्हा परिषद निवडणुकीतील शिवसेनेला आलेल्या अपयशानंतर शिवसेना नेते संजय राऊत अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ राऊत यांनीही पुण्यात तळ ठोकला आहे. रात्रीच पुण्यात येऊन संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला.

शिवसेना नेते संजय राऊत काल रात्री उशिरा पुण्यता आले. त्यांनी पुण्यात आल्यावर रात्री उशिराच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. संघटनात्मक बांधणी, वॉर्डांची स्थिती, राज ठाकरे आणि अमित ठाकरे पुण्यात सातत्याने येत असल्याने पुण्यातील बदलेली हवा, शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील गटबाजी आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.

दरम्यान, काल रात्री शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर राऊत आजही दिवसभर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. पुण्यातील वेगवेगळ्या भागातील पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. तसेच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. स्वबळावर लढायची वेळ आल्यास शिवसेना किती जागांवर लढू शकते याचा आढावाही या बैठकीत घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संजय राऊत यांचा गेल्या दोन महिन्यातील हा तिसरा पुणे दौरा आहे. त्यातच जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनाला फारसं चांगलं यश मिळालं नाही. शिवसेनेचा राज्यात मुख्यमंत्री असतानाही शिवसेना या निवडणुकीत चौथ्या स्थानी फेकल्या गेली. तर भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरला. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली असून आता शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.

तर, मनसेनेही पुणे जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे सातत्याने पुण्यात येत असून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. तसेच राष्ट्रवादी आणि भाजपनेही पुणे पालिका जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यामुळे पुणे कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जिलहा परिषदेत कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या बाजी?
💠 धुळे – 15 (भाजप 8, शिवसेना 2, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 2, इतर 0)
💠 नंदूरबार – 11 (भाजप 4, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, काँग्रेस, 3 इतर 0)
💠 अकोला – 14 (14 भाजप 1 शिवसेना 1 राष्ट्रवादी 2 काँग्रेस 1 वंचित 9)
💠 वाशिम -14 (भाजप 2, शिवसेना 1, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 2, इतर 4 )
💠 नागपूर -16 (भाजप 3, शिवसेना 0, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 9, इतर 2)
💠 पालघर-15 (भाजप 5, शिवसेना 5, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 0 इतर 1)