…म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस; मुख्यमंत्र्यांचा खुलासा

0
500

मुंबई, दि. १७ (पीसीबी) –राज्य सहकारी बँकेने काही लोकांना पात्रता नसताना कर्ज दिली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्देशानुसार त्यांनाही कर्ज देण्यात आल्याचा उल्लेख बँकेच्या ठरावात करण्यात आला आहे.  यामुळेच पवारांची चौकशी करण्यासाठी ईडीकडून नोटीस पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.  

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोकांना कर्ज देण्यासाठी शरद पवार यांनी पत्र दिल्याची नोंद आहे. त्यामुळे अशा पत्राची आणि कर्जाची चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ईडीकडून तपास सुरू असून शरद पवारांची चौकशी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्याचा  गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान, शरद पवारांना ईडीने नोटीस पाठविल्यानंतर राष्ट्रवादीच्या कर्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. तसेच शरद पवारांनी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली होती. परंतु कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचे टाळले होते. तसेच ईडीने आताच चौकशीसाठी येण्याची गरज नसल्याचे म्हटले होते.