Maharashtra

…म्हणून मोदी जनतेला छळत आहेत; व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे फटकारे  

By PCB Author

January 19, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना छळले आहे, म्हणून मोदी जनतेला छळत आहेत, असा टोला  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  व्यंगचित्रातून लगावला आहे.  राज यांनी ट्विटरवर मोदी यांच्या वर निशाणा साधणारे व्यंगचित्र शेअर केले आहे.

या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी मोदींच्या विधानाचा दाखला दिला आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. काँग्रेसने मला छळले, म्हणून मी जनतेला छळतो, असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत  बोलताना मोदी म्हणाले होते की,  गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर वाटेल ते आरोप करुन माझा छळ करण्यात आला. २००७ पासून काँग्रेस मला तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहे. त्यांनी अमित शाह यांना तुरुंगातही टाकले. पण आम्ही कधीही गुजरातमध्ये सीबीआयला प्रवेशबंदी केली नाही. माझी तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली होती, असे मोदींनी सांगितले होते.