…म्हणून मी जल्लोषाचा फेटा बांधला नाही – अजित पवार

0
3041

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – राज्य विधीमंडळात मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयकाला आज (गुरूवार) मंजुरी देण्यात आली. त्यानंतर जल्लोष करणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जोरदार हल्ला चढवला. आरक्षण देण्याच्या निर्णयात प्रत्येकाचा वाटा आहे. त्यामुळे कुणी एकाने त्याचे श्रेय घेणे चुकीचे आहे. मलाही जल्लोषाचा फेटा बांधता आला असता. मात्र,  आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या ४० तरुणांचे बलिदान माझ्या डोळ्यांपुढे आहे,’ असे अजित पवार म्हणाले.

विधिमंडळात मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर अजित पवार यांनी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा जल्लोष करणाऱ्या सत्ताधारी आमदारांवर टीकेची झोड उठवली. कोणत्या गोष्टीचा जल्लोष करायचा हे आपल्याला समजले पाहिजे. हे आरक्षण सहजासहजी मिळालेले नसून अनेकांनी त्यासाठी कष्ट उपसले आहेत. बलिदान दिले आहे. अनेकांच्या घरी यंदा दिवाळी साजरी झाली नाही. त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करणे मला महत्त्वाचे वाटते. म्हणून मी जल्लोषाचा फेटा बांधला नाही,’ असे पवार म्हणाले.

‘मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आहेच, मात्र १०० टक्के नाही. कारण, हे आरक्षण मिळवण्यासाठी बरेच काही गमवावे लागले आहे, असे पवार  म्हणाले. मराठा आरक्षणाचं श्रेय सर्वांचे आहे. समाजातील सर्व घटकांनी त्याला पाठिंबा दिला होता, असे पवार म्हणाले.