‘…म्हणून महावितरण अधिकाऱ्यास केली मारहाण’; एकावर गुन्हा दाखल

0
230

पिंपरी, दि.27 (पीसीबी) : बंद पडलेल्या ट्रांसफार्मरकडे दुरुस्तीसाठी जात असताना एकाने महावितरण अधिकाऱ्यास मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने त्याच्या घरातील लाईट दुरुस्त करून घेतली. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजता मावळ तालुक्यातील आंबी गावात घडली.

प्रवीण मधुकर जांभूळकर (वय 44) असे मारहाण झालेल्या महावितरणच्या अधिकार्‍याचे नाव आहे. त्यांनी याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश दरेकर (रा. आंबी गाव, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण जांभुळकर हे महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतात. शनिवारी दुपारी आंबी गावातील सावली हॉटेल जवळ असलेल्या महावितरणचा ट्रान्सफॉर्मर ड्रॉप आउट फ्यूज चेक करण्यासाठी फिर्यादी त्यांचा दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपीने रस्त्यात दुचाकी आडवी लावून फिर्यादी यांना ट्रान्सफॉर्मरकडे जाण्यापासून रोखले. त्यानंतर काठीने बेदम मारहाण करून जखमी केले. काठीचा धाक दाखवून फिर्यादी यांना दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने त्याच्या घराकडे नेऊन फिर्यादी यांना बंद पडलेली लाईट दुरुस्त करण्यास लावली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.