Maharashtra

…म्हणून भाजपाला मोठा घास द्यावा लागला – शिवसेना

By PCB Author

October 02, 2019

मुंबई, दि.२ (पीसीबी) – शिवसेना-भाजपा युतीच्या जागावाटपाची घोषणा झाली आणि फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला निकाली निघाला. त्याचबरोबर शिवसेनेची १२४ जागांवर बोळवण करत भाजपाने मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, भाजपा राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष असल्याचे मान्य करत भाजपाला मोठा घास देण्यामागच्या कारणांचा शिवसेनेने उलगडा केला आहे. “युती म्हटली की, देवाण-घेवाण व्हायचीच. यावेळी शिवसेनेच्या बाबतीत घेवाण कमी व देवाण जास्त झाली हे मान्य करावेच लागेल, पण घेवाणीत जे आले त्यात शंभर टक्के यश मिळवायचेच असा आमचा निर्धार आहे,” असं शिवसेनेने म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळीच भाजपा-शिवसेना युतीने राज्याच्या विधानसभा निवडणुकीत फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला ठरवला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला १२४ जागा आल्या आहेत. तर मित्रपक्षांसह भाजपाला १६४ जागा मिळाल्या आहेत. या जागावाटपाची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेला लहान ठरवण्यात भाजपा यशस्वी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः विरोधकांनी शिवसेनेला भाजपासोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याची टीका सुरू केली आहे.

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून जागावाटपावर भाष्य केले असून, शिवसेनेला घेवाणीपेक्षा देवाणच जास्त करावी लागली असे म्हटले आहे. “महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीवर अखेर मोहोर उठली आहे. दोन्ही बाजूच्या जबाबदार नेत्यांच्या सही-शिक्क्याने संयुक्त पत्रक निघाले. युती म्हटली की, देवाण-घेवाण व्हायचीच. यावेळी शिवसेनेच्या बाबतीत घेवाण कमी व देवाण जास्त झाली हे मान्य करावेच लागेल, पण घेवाणीत जे आले त्यात शंभर टक्के यश मिळवायचेच असा आमचा निर्धार आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष बनला आहे. अनेक पक्षांतले प्रमुख लोक महाराष्ट्रात त्यांच्या ओसरीवर बसले आहेत. त्यांचा यथायोग्य पाहुणचार करायचा म्हटल्यावर त्यांना मोठा घास लागणार व आम्ही तो मोठय़ा मनाने मान्य केला आहे. यास सिंहाचा वाटा म्हणायचे की आणखी काही हे ज्याचे त्याने ठरवायचे, पण भाजपच्या पदरात ‘मित्रपक्ष’ नामक दत्तक विधानेही जास्त आहेत, त्यांनाही वाटा द्यावा लागेल अशी एकंदरीत गोळाबेरीज झाली व त्यात शिवसेनेने सवाशेच्या आसपास जागा लढवण्याचे ठरवले. ‘युती’त दोन पक्षांची जास्तीत जास्त मुद्दय़ांवर सहमती आहे. तसे विरोधकांच्या बाबतीत सांगता येईल काय? रिंगणात उतरणे सोपे असते, पण रिंगणात टिकणे अवघड असते. आता मैदानही आमचे, रिंगणही आमचे व रिंगणात धावणारे विजयी अश्वही आमचे. युती झाली आहे, विजय पक्का आहे!,” असं शिवसेनेने म्हटले आहे.