“…म्हणून त्या कारने आत्महत्या केली”; जितेंद्र आव्हाडांचा केंद्राला टोला

0
302

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : मुंबईतील घाटकोपर परिसरात पार्किंगमध्ये उभी करण्यात आलेली कार बुडाल्याची घटना घडली. ही कार विहिरीत बुडत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आणि घटनेची चर्चा सुरू झाली. यावरून काँग्रेसने मुंबई महापालिकेवर हल्लाबोल केला आहे. हाच व्हिडीओ ट्विट करत आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरीत्या मोदी सरकारला टोला लगावला आहे.

घाटकोपर परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कारची घटना आज सर्वांचा चर्चेचा विषय ठरत आहे. घाटकोपर पश्चिममधील कामा लेन येथे असलेल्या रामनिवास या जुन्या सोसायटीत असलेली विहिरीवर सोसायटीने सिमेंटचं छत तयार करून झाकलेली होती व त्यावर सोसायटीतील रहिवाशी वाहनं पार्क करीत असत. मात्र, तीन-चार दिवस झालेल्या पावसामुळे या विहिरीवरील सिमेंट छत खचले. यावेळी इथे पार्क करण्यात आलेली पंकज मेहता यांची कार विहिरीत बुडाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला. हा व्हिडीओ ट्विट करत राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरित्या मोदी सरकारवर निशाणा साधला. देशात पेट्रोलचे दर शंभरीच्या पार गेले आहेत, तर डिझेलचे दरही शंभरीच्या घरात पोहोचले आहेत. इंधन दरवाढीच्या मु्द्द्यावर बोट ठेवत आव्हाड यांनी सरकारला टोला लगावला. “इंधनाचे दर वाढत असल्याने कारने आत्महत्या केली,” असं एकाच वाक्यात भाष्य करत आव्हाड यांनी खोचक टीका केली.

या घटनेवरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुंबई महापालिका आणि अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. निरुपम घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आणि “अद्भूत! मुंबईतील घाटकोपर परिसरात हळूहळू बुडत असलेली कार… मुंबईतील नागरी सुविधा कशा पद्धतीने रसातळाला चालल्या आहेत, याचंच हे एक उदाहरण आहे. बृहन्मुंबई महापालिकेनं प्रसिद्धीतून वेळ मिळाल्यास याकडेही लक्ष द्यावं,” असा टोला निरुपम यांनी लगावला आहे.