‘….म्हणून कामगारांनी मालकाला रस्त्यात अडवून कार फोडली’

0
266

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – कंपनीतील एका कामगाराला कामावरून काढून टाकल्याने त्याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून कंपनीच्या मालकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत कारची तोडफोड केली. तसेच दगड मारून कंपनी मालकाला जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 12) सायंकाळी सव्वासहा वाजता एमआयडीसी भोसरी येथे घडली.

कार्तिक कल्याण आय्यर (वय 39, रा. बाणेर रोड, औंध) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मनोज साळवे आणि त्याचे तीन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आय्यर कारमधून मंगळवारी सायंकाळी घरी जात होते. एमआयडीसी भोसरी मधील फर्माईश हॉटेल समोर आरोपींनी त्यांची कार अडवली. ‘मेरे को तुने काम से क्यू निकाला’ असे म्हणून मनोज साळवे याने आय्यर यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. लोखंडी रॉडने कार फोडून नुकसान केले. कारवार दगड फेकून मारला असता तो दगड आय्यर यांच्या पायाला लागून ते जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.