‘…म्हणून अखेरचा कसोटी सामना शेवटी रद्द’

0
611

नवी दिल्ली, दि.१० (पीसीबी) : हिंदुस्थानी क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर असून, कसोटी मालिकेतील 5 वा कसोटी सामना शुक्रवारपासून मँचेस्टर इथे खेळवला जाणार होता. मात्र हा सामना रद्द करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सहमतीने हा निर्णय घेतला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि चौथा सामना जिंकत हिंदुस्थानचा संघ 2-1 असा आघाडीवर होता. या मालिकेतील अखेरचा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार होता. आज दुपारी 3.30 (हिंदुस्थानी वेळेनुसार) हा सामना सुरू होणार होता. मात्र हा सामनाच स्थगित करण्यात आल्याचे वृत्त होते. परंतु आता हा सामनाच रद्द करण्यात आला आहे. मात्र सामना रद्द झाल्याने मालिका जिंकली कोणी हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बीसीसीआयसोबत झालेल्या चर्चेनंतर ओल्ड ट्रॅफर्डमध्ये हिंदुस्थान आणि इंग्लंडच्या पुरुष संघात खेळला जाणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचे संकट आणि त्यामध्ये आगामी काळात वाढ होण्याची शक्यता, यामुळे हा सामना रद्द करण्यात आल्याचे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. दरम्यान, इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने आधी हिंदुस्थानचे खेळाडू मैदानात उतरण्यास असमर्थ असल्याचे म्हटले होते. त्यामुळे हा सामना इंग्लंडने जिंकला असून मालिका 2-2 बरोबरीत आल्याचे म्हटले. मात्र यानंतर त्यांने आपले विधान बदलले आणि हा सामना रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. सध्या हा सामना रद्द झाला असला तरी मालिकेचा विजेता ठरवण्यासाठी पुढील वर्षी याचे आयोजन केले जावू शकते. पुढील वर्षी हिंदुस्थानचा संघ टी-20 आणि वन डे मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर येणार असून यावेळी हा कसोटी सामना खेळवा जावू शकतो.

हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्यानंतर गुरुवारी असिस्टंट फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे टीम इंडियाचे सराव सत्र रद्द करून सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पाचवा सामना वेळेत सुरू होईल अशी आशा होती. मात्र सामना रद्द करण्यात आला असून यामागील कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.