Maharashtra

“…म्हणूनच सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनात चांदणं’ दिसतंय”

By PCB Author

October 18, 2021

मुंबई, दि.१८ (पीसीबी) : महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवाईवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणा आमच्याविरोधात वापरता ना. मग ईडी, सीबीआयसह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. त्यांना पाहून अतिरेकी पळून जातील, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय. राऊतांच्या या टीकेला आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाविकास आघाडीला आयकर विभाग आणि ईडीची एवढी भीती वाटतेय. सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनात चांदणं’ दिसतंय, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावलाय.

‘महाविकास आघाडीला आयकर विभाग आणि ईडीची एवढी भीती वाटतेय. सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनात चांदणं’ दिसतंय. केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणा-या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय. हे ‘अलीबाबा अन् 40 चोरांचं’सरकार..चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल’, असं ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना टोला हाणलाय.

‘सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते.. चुकवलेले लाखों रूपये मागच्या दारानं लपत छपत पुन्हा जमा करावे लागले… याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर आहे. आता आदळआपट करून उपयोग नाही.. ‘जैसी करणी, वैसी भरणी…’, असं ट्वीटही चित्रा वाघ यांनी केलंय.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआयला जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. खूप पॉवरफुल्ल लोकं आहेत. पाठवा ना. अतिरेकी पळून जातील. ते आमच्यावर ज्या प्रकारे ईडी, सीबीआयच्यामाध्यामातून हल्ला करता, या तिन्ही चारही संस्था तुम्ही बदनाम केल्या आहेत. या संस्थांचा तुम्ही राजकीय गैरवापर केला आहे. जा ना काश्मीरमध्ये पाठवा ना. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा. आम्ही अतिरेक्यांची कागदपत्रे देऊ. फिरत बसतील काश्मीर, अनंतनाग, बारामुल्ला. जा म्हणा, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.