“…म्हणाला तुमची सोन्याची अंगठी तुमच्या खिशात ठेवली” थोड्यावेळाने पाहिलं निघाला दगड; ३० हजारांची फसवणूक

0
537

चाकण, दि. २३ (पीसीबी) – दोन ठगांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील सोन्याची 30 हजारांची अंगठी खिशात ठेवण्यास सांगून हातचलाखी करून पळवली. ही घटना मंगळवारी (दि. 22) दुपारी दीड वाजता चाकण गावात आंबेठाण चौकात घडली.

भानुदास किसन वाव्हळ (वय 70, रा. आंबेठाण चौक, चाकण) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन जानोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाव्हळ मंगळवारी दुपारी दीड वाजता आंबेठाण चौकात थांबले होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना हाक मारून त्यांना दुसरा व्यक्ती बोलावत असल्याचे सांगितले. फिर्यादी दुस-या व्यक्तीकडे गेले असता, दुसऱ्या व्यक्तीने सांगितले की, ‘तिकडे जाऊ नका, तिकडे फार वाईट धोका आहे. तुमच्या बोटातील अंगठी काढून खिशात ठेवा.’ त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्या बोटातील 30 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढली. फिर्यादी यांच्या हातातून त्या व्यक्तीने अंगठी घेतली आणि फिर्यादी यांच्या खिशात ठेवण्याचा बहाणा केला. अंगठी ठेवण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी यांच्या खिशात दगडाचा खडा ठेवला आणि अंगठी घेऊन पसार झाला. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.