“हा म्हणजे ‘मढ्यावरचे लोणी खाणे’ असा प्रकार आहे”; ‘या’ भाजपा नेत्यांची संजय राऊतांवर आगपाखड

0
319

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर ताशेरे ओढलेत. ‘सर्वज्ञानी असलेले शिवसेना नेते संजय राऊत आपल्या सवयीप्रमाणे परत एकदा आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत’, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. नेत्यांनी पूरस्थिती असलेल्या भागात पर्यटन टाळावे असे विधान संजय राऊत यांनी केले असता यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे. प्रशासनाने तळीयेच्या दुर्घटनेवेळी तत्परतेने मदत केली असती तर खूप जणांचे प्राण वाचू शकले असते असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

चित्र वाघ म्हणाल्या कि, “भाजपचे नेते प्रवीण दरेकर व वृत्तवाहिन्या त्या ठिकाणी आधी पोहचल्या, तेथील नागरिकांनीच ३९ मृतदेह बाहेर काढले आणि त्यानंतर १६ तासाने प्रशासन अवतरले. ज्यावेळेस आपण प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणालाच प्राधान्य देतो, तेंव्हा होतकरू प्रशासकीय अधिकारी बाजूला सारले जातात व सरकार पंगु होते. ठाकरे सरकारच्या गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात अशा दुर्घटनांमधे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले. संजय राऊत यांनी यानंतर सुद्धा बदलीच्या अर्थकारणालाच प्राधान्य देणे म्हणजेच ‘मढ्यावरचे लोणी खाणे’ असा प्रकार आहे.’

एवढच नाही तर पुढे त्या असंही म्हणाल्या कि, “केंद्रातर्फे नारायण राणे नुकसानीचा आढावा व मदतकार्यासाठी दौरा करत असताना अशावेळी अशा संकटात सुद्धा कुणाच्या सांगण्यावरून अधिकारी गैरहजर होते? पुरग्रस्त कोकणच्या जनतेला हे अपेक्षितच होते अशावेळेस तरी आपण आपली राणे साहेबांविषयीची पोटदुखी बाजूला सारून त्यांच्या हेतुला आपण साथ द्याल, परंतु आपण आपल्या हेकेखोर राजकारणाला प्राधान्य दिले. बाकी फौजफाटा व दर्शनसोहळा कुणी केला? याचे उत्तर येणाऱ्या दिवसात आपल्या कर्तुत्वामुळे कोकणच्या जनतेला मिळणारच आहे”, असा दावा सुद्धा यावेळी त्यांनी केला.