‘म्यूकोरमायकोसीस’ रोगाचा वाढता धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कऱण्याची जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांची मागणी

0
2684

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – कोविड रुग्णांनामध्ये म्यूकोरमायकोसीसचा वाढता धोका लक्षात घेऊन त्याबाबत तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असून ‘Liposomal amphotericin B’ हे औषध पूरक प्रमाणात उपलब्ध करण्याची नितांत आवश्यकता आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने या मुद्यांची पूर्ताता कऱण्याच्या दृष्टीने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना त्याबाबात एक लेखी निवेदन सीमा सावळे यांनी दिले आहे.

आपल्या निवेदनात जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे म्हणतात, ‘देशभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता कोरोना बाधितांना म्युकोरमायकोसिस या फंगल इन्फेक्शन चा संसर्ग होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाशी लढताना रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे अनेक रुग्णांना म्यूकोरमायकोसिसची बाधा होत आहे. महाराष्ट्रातही म्युकोरमायकोसिसने बाधित रुग्ण आढळले आहेत. अशा रुग्णांवर व्यापक सर्जिकल आणि वैद्यकीय उपचार वेळीच करावे लागतात. देशातील अनेक राज्यात म्यूकोरमायकोसिस बाधित रुग्णांचा मृत्यू होत असून या आजारामुळे अनेकांना अंधत्व आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. म्यूकोरमायकोसिसचा संभाव्य धोका लक्षात घेऊन अशा रोगाने बाधित होणाऱ्या रुग्णांचे उपचारासाठी तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी काही महत्वाच्या सुचना करत असून त्यावर महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.’

म्युकोरमायकोसिसचे प्रमाण आता इतके झपाट्याने वाढत असून ते आता भविष्यात साठीच्या आजाराप्रमाणेच फैलावू शकतो, अशी भीती आता डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. म्युकोरमायकोसिस आजाराने बाधित रुग्णांचा उपचार करताना संसर्गजन्य रोग तज्ञ, मक्सीलोफेशियल सर्जन्स, आय सर्जन्स, न्यूरोसर्जन्स, कान नाक घसा तज्ञ इत्यादी तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासू शकेल. त्यामुळे प्रस्तुत आजारावर उपचार करण्यासाठी मनपाच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक तज्ञ डॉक्टर्स व सर्जन्सची पूरक उपलब्धता करण्याचे नियोजन तातडीने करण्यात यावे, अशी सुचना सावळे यांनी केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या अचानकपणे मोठ्याप्रमाणात वाढली असल्याने अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे. वेळीच नियोजन न झाल्याने रेमडेसिव्हिर, टोसिलीझुमॅब या औषधांचा प्रचंड तुटवडा झाला हे वास्तव आहे. आता तर अशा औषधांच्या विक्रीत मोठ्याप्रमाणात काळाबाजार होत असल्याचे प्रकार घडत आहेत. म्युकोरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा होण्याची दाट शक्यता आहे. म्युकोरमायकोसिस रुग्णाचा उपचार करण्यासाठी प्रामुख्याने ‘Liposomal Amphotericin B’ हे औषध वापरे जात असल्याने या औषधाचा तुटवडा होत आहे. सुमारे १५००/- रुपयांना मिळणाऱ्या ‘Amphotericin B’ (एक इंजेक्शन ५० मी.ग्र.) या इंजेक्शनचा काळाबाजार होत असून हे इंजेक्शन आता ७,००० ते ८,००० रुपयांना विकले जात असल्याचे वृत्त काही वर्तमान पत्रांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. सदर औषध हे रुग्णाच्या वजनानुसार दिले जात असल्याने (५ मी.ग्र. प्रती किलो) साधारणत: ६० किलो वजनाच्या एका रुग्णाला दिवसाला सुमारे ६ इंजेक्शन्सची आवशकता भासणार आहे. म्हणजेच काळाबाजारात सुमारे ४०,००० ते ५०,००० पर्यंत या इंजेक्शनच्या डोसची विक्री सुरु आहे. सदर बाब अत्यंत गंभीर असून रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये घबराट निर्माण करणारी आहे. म्हणून म्यूकोरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारे सर्व औषधांची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, असे सिमा सावळे म्हणाल्या.

कोरोनामुळे याआधीच नागरिक भयभीत आहेत. आता म्यूकोरमायकोसिसचा संसर्ग होण्याच्या भीतीने कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्या मध्ये अगतिकता अधिकच वाढत आहे. अशा स्थितीत कोरोना मधून बरे होणाऱ्या रुग्णांना म्यूकोरमायकोसिसचा संसर्ग होऊ नये यासाठी कोणत्या खबरदाऱ्या घेण्यात याव्या ? संसर्गाची पूर्व लक्षणे कशी ओळखावीत ? उपचार पद्धती काय आहे ? रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतरांना त्याचा धोका होऊ शकतो का ? अशी अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहेत. तरी याबाबत तज्ञांच्या सल्ल्याने काही मार्गदर्शक सूत्रे तयार करून प्रकाशित करण्यात यावी. जेणेकरून अशा आजाराबाबत विनाकरण होणारे गैरसमज व त्यातून निर्माण होणाऱ्या भितीस वेळीच आळा घालता येईल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिव्हिर, टोसिलीझुमाब इंजेक्शन्स, वेंटीलेटर्स, बेड, ऑक्सिजन बेड्स, ऑक्सिजन इत्यादी व्यवस्था करताना अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला आहे. त्यामुळे नव्याने संसर्गाचा धोका असलेल्या या म्यूकोरमायकोसिस सारख्या घातक आजाराशी सामना करण्यास आपण परिपूर्ण व आगाऊ तयारी करावी, अशी आग्रही मागणी सिमा सावळे यांनी केली आहे.