मोहोळ हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून काम करण्याची प्रचंड क्षमता – देवेंद्र फडणवीस

0
542
पुणे, दि.१८ (पीसीबी) – कोथरूडला पहिल्यांदाच महापौर पद मिळाल्यानिमित्त सर्वपक्षीय कोथरूडकरांकडून महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सोमवारी नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 
फडणवीस म्हणाले, मुरलीधर मोहोळ यांचे काम मी जवळून पाहिले आहे. ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून काम करण्याची प्रचंड क्षमता, जिद्द आणि विनम्रता या बाबींच्या जोरावर त्यांनी चारवेळा नगरसेवकपद आणि आता महापौरपद मिळविले आहे. राजकीय आयुष्याची त्यांची ही सुरुवात आहे. आगामी काळात त्यांना महत्त्वाची पदे मिळतील, महापौरपदी काम करताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविता येतात, याचे समाधान असते. शहराची क्षमता मोठी आहे. पुण्याचे शहरीकरण वाढत असताना दोन वेगळ्या महापालिका होऊ शकतील. त्यामुळे खासगी वाहनांवर नियंत्रण ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरणावर भर द्यावा लागणार आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोथरूडचा समतोल विकास करावा लागणार आहे. मोहोळ यांना राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी महत्त्वाची पदे मिळविली आहेत. त्यावरून त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे दिसून येते. केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार मी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढविली. मोहोळ हेही निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र नाराज न होता त्यांनी विजयाचा रथ खेचून आणला. कोथरूडच्या विकासाच्या दृष्टीने कोथरूड सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे.
शहरात कोथरूडची स्वतंत्र ओळख आहे. विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळींचे कोथरूडमध्ये वास्तव्य आहे. पक्षनेतृत्वामुळे मला काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे पक्षनेतृत्व आणि कोथरूडवासीयांनी दाखविलेल्या विश्वासाला गालबोट लागणार नाही, असे वर्तन कायम राहील, असे आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
कोथरूडचे आमदार, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोहोळ यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी राज्याचे माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार, समितीचे सचिव डॉ. संदीप बुटाला, सहसचिव प्रवीण बढेकर, कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुधाकरराव आव्हाड, संवाद पुणेचे सुनील महाजन, मुरलीधर यांची पत्नी मोनिका, खासदार गिरीश बापट, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यावेळी उपस्थित होते.