मोहिते-पाटील म्हणजे कलई करून मोडीत काढलेली भांडी – संजय शिंदे

0
679

सोलापूर, दि. २३ (पीसीबी) – राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी हल्ला चढवला आहे. मोहिते-पाटील म्हणजे कलई केलेली भांडी आहेत, ही भांडी आता मोडीत निघालेली आहेत, अशा शब्दांत शिंदे यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

संजय शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केलेली आहे. आज (शनिवार)  माढ्यातील रांझणी येथील ओंकारेश्वर मंदिरातून  शिंदे यांनी प्रचाराचा  नारळ फोडला. यावेळी आमदार बबनराव शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना शिंदे म्हणाले की, ग्रामीण भागात मोडीत निघालेल्या भांड्याना  कलई करतात. तशीच  कलई करून मोहिते पाटील यांना शरद पवारसाहेबांनी सत्तेत टिकवून ठेवले होते.  परंतु आज लोकांना समजून आले आहे की,  ही मोडीत निघालेली भांडी आहेत.

मोहिते पाटलांना पवारसाहेबांनी दहा वर्ष राजकारणात विविध पद दिली आहेत. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेसाठी राष्ट्रवादीने काहीच केले नाही, असे कारण सांगून मोहिते-पाटील राष्ट्रवादीतून  बाहेर पडले आहेत. मात्र,  स्वतः च्या आणि पुढच्या पिढीच्या स्थिरीकरणासाठी त्यांनी भाजप प्रवेश केला आहे, असा घणाघात शिंदे यांनी केला.