मोहरमच्या शुभेच्छा दिल्याने खासदार अमोल कोल्हेंवर टीकेचा भडीमार

0
1667

मुंबई, दि.११ (पीसीबी) – मोहरमच्या शुभेच्छा दिल्याने खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीकेचा भडीमार होतो आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन मोहरमच्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मोहरम हा महिना शिया पंथाच्या मुस्लीम बांधवांसाठी दुःख देणारा असतो. काळ्या रंगाचे कपडे घालून ते शोक व्यक्त करतात. शिया पंथीय मुस्लीम समाज मोहरमच्या १० व्या दिवशी कडक उपास करतात. सुन्नी समुदायाचे मुस्लीम या दिवशी नमाज अदा करुन शोक व्यक्त करतात. मोहरम हा शुभ सण नाही तर दुःख व्यक्त करण्याचा सण आहे. १४०० वर्षांपूर्वी इमा हुसैन आणि त्यांच्या मुलांना ठार करण्यात आलं होतं. त्याआधी त्यांचे हाल करण्यात आले होते. अशी सगळी पार्श्वभूमी मोहरमला आहे. त्याचमुळे इस्लाम कॅलेंडरच्या दहाव्या दिवशी मोहरम असतो. या दिवसाला रोज-ए-आशुराही म्हटले जाते. हा शोक व्यक्त करण्याचा दिवस असतो शुभेच्छा देण्याचा नाही. मात्र खासदार अमोल कोल्हे यांनी मोहरमच्या शुभेच्छा दिल्याने ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत.

कुठे शुभेच्छा द्याव्यात ते तरी कळते का तुम्हाला असे एका मुलीने अमोल कोल्हे यांना कमेंट करुन विचारले आहे. तर राष्ट्रवादीवाल्यांनो मोहरमचा इतिहास बघा आधी, मोहरम मुस्लिमांचा सण नाही तर वाईट दिवस आहे. त्याच्या शुभेच्छा कसल्या देता? असे एका नेटकऱ्याने विचारले आहे. या आणि अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया देत अमोल कोल्हे यांना यावरुन चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.