Chinchwad

मोहननगर पोलीस चौकीत तोडफोड करुन पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या तरुणास अटक

By PCB Author

June 27, 2019

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी पोलिस ठाण्याच्या अंकीत असलेल्या मोहननगर पोलिस चौकीमध्ये चौकशीसाठी आणलेल्या एका आरोपीने चौकीत राडा घालत टीव्ही, टेबल खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच मोठमोठ्याने आरडाओरड करुन पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.२६) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी आरोपी योगेश दामोदर पवार (वय २९, रा. रामनगर, सहजीवन कंपनीसमोर, चिंचवड) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मोहननगर पोलीस चौकीतील पोलिसांनी एका प्रकरणात आरोपी योगेश याला चौकीत चौकशीसाठी आणले होते. यावेळी आरोपी योगेश याने चौकीत धिंगाना घालून पोलीस हवालदार खाडे यांना शिवीगाळ केली. तसेच टीव्ही, टेबल खुर्च्यांची तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी पोलिसांनी योगेश विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख तपास करत आहेत.