मोशी कचरा डेपोतील मृतदेह प्रकरणात ठेकेदारावर कडक कारवाई करा – नाना काटे

0
361

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – उपरोक्त विषयान्वये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोवर गुरुवारी रात्री मृतदेह आढळून आला आहे. कचरा संकलन करणा-या डंपरमधून संबंधित मृतदेह कचरा डेपामध्ये आल्याचे समजते. हा प्रकार अतिशय गंभीर असून कचरा गोळा करणा-या, डेपोची देखभाल, कचरा विलगीकरण व प्रक्रीया करणा-या ठेकेदारांचा भोंगळ कारभार त्यामुळे चव्हाटावर आला आहे. संबंधीत ठेकेदारावर कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाका अशी मागणी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.

पिंपरी चिंचवड शहरातील कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यावर पालिका कोट्यावधी रुपये खर्च करते आहे. सध्या बी.व्ही.जी. इंडीया आणि ए.जी. इन्व्हायरो प्रा.लि. अशा दोन ठेकेदारांकडून कचरा संकलनाचे काम चालू आहे. अँथनी लारा लि. या ठेकेदाराकडे कच-यावर प्रक्रीया करण्याचे काम आहे. शहरातून गोळा होणारा कचरा मोशी येथील डंपिंग ग्राऊडवर टाकला जातो. या ठेकेदाराकडे कचरा अलगीकरणाची काम सुध्दा आहे. त्यामुळे कचरा डेपोत येणा-या गाड्याची पाहणी करणेची जबाबदारी या ठेकेदाराकडेच आहे. कच-यांच्या गाडीत काय आहे काय नाही याची शहनिशा केली जात नाही. मागील काही दिवसापूर्वी वजन भरणेसाठी माती,वाळू गाडीत भरल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत, असेही काटे यांनी त्यांच्य निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाच्या महामारीमध्ये कच-या गाडीतून कचरा डेपोपर्यंत मृतदेह जाणे, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. प्रशासनाचा व ठेकेदारांचा हलगर्जीपणाचा कळसच झाला. तो मृतदेह कचरा गाडीत कसा आला. यामध्ये काही घातपात झाला आहे काय ? याची सविस्तर चौकशी होणे गरजेचे आहे. प्रशासनाचे ठेकेदारांवर अजिबात नियंत्रण नाही हेच या बाबीवर सिध्द होते ,असा आरोप काटे यांनी केला.

कचरा डेपोमध्ये मृतदेह सापडणे हि अतिशय गंभीरबाब असून मनपाची प्रतिमा मलिन झालेली आहे. त्यामुळे याबाबत सविस्तर चौकशी करुन संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करुन त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी काटे यांनी केली आहे.