मोशीत रिक्षा खरेदीच्या वादातून दोघा भावांना लोखंडी रॉडने जबर मारहाण

0
433

मोशी, दि. २० (पीसीबी) – रिक्षा खरेदीच्या वादातून दोघा भावांना बोलवून घेत चौघाजणांनी लोखंडी रॉड आणि हाताने जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.१८) रात्री साडेसातच्या सुमारास मोशी टोलनाका येथे घडली.

बाजीराव रामराव सरांडे (वय २१) आणि विकी सरांडे (दोघे रा. बागडेवस्ती, कुरळी फाटा) असे मारहाणीत जखमी झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आलीशान अनिस शेख (वय २२, रा. त्रिवेणीनगर चौक, तळवडे) आणि त्याच्या ३ अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  काही दिवसांपूर्वी विकी याने आरोपी आलीशान याच्याकडून त्याचा रिक्षा विकत घेतला होता. यानंतर त्याच्यात रिक्षा खरेदी वरुन वाद झाला. यावर शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास  आरोपी आलीशान आणि त्याच्या ३ साथीदारांनी बाजीराव आणि विकी या दोघांना मोशी टोलनाका येथे बोलवून घेत लोखंडी रॉड तसेच हाताने जबर मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.