मोशीत भोंदू अम्मा भगवान भक्तांकडून आठ जणांची फसवणुक

696

मोशी, दि. १५ (पीसीबी) – अम्मा भगवान या भरवत असलेल्या संपूर्ण जीवन मुक्तीसाठीच्या कलकी आर्मीमध्ये सहभागी होण्यासाठी बनावट आयकार्डांचे वाटप करून आठ अम्मा भगवान भक्तांची भोंदू अम्मा भक्तांनी फसवणूक केली. ही फसवणुक २००५ ते ऑक्टोबर २०१८ दरम्यान मोशी येथे सुरु होती.

याप्रकरणी ५५ वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निवेदना उर्फ माधवी (वय ४४, रा. कोंढवा), अस्मिता अनिल राव (वय ३४, रा. डांगे चौक, वाकड), पी राधादेवी उर्फ विशिष्ठा (वय ४२, रा. डांगे चौक, वाकड), अर्चना हारगुडे (वय ३८, रा. वाघोली) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या २००५ पासून अम्मा भगवान यांच्या भक्त आहेत. तेंव्हापासून फिर्यादी यांनी आरोपी महिलांना अम्मा भगवान यांचे वैयक्तिक दर्शन, आश्रमात हवन, नवग्रह हवन, अन्नदान करण्यासाठी रोख स्वरूपात पैसे दिले आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये सर्व आरोपी महिला फिर्यादी यांच्या घरी आल्या त्यांनी सांगितले की, संपूर्ण जीवन मुक्तीसाठी कलकी आर्मीमध्ये ६४ हजार लोकांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी लाखो कार्डाचे वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक कार्डाची किंमत ५०० रुपये आहे.

यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी आरोपींना ५०० रुपये देऊन एक कार्ड घेतले. त्यावर आरोपींनी केवळ नाव, मोबाईल नंबर आणि सिरीयल नंबर लिहिला होता. त्या कार्डवर कोणत्याही ट्रस्टचे नाव अथवा रक्कम लिहिली नसल्याने फिर्यादी यांना शंका आली. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या काही महिलांकडे याबाबत चौकशी केली असता त्यांच्या ओळखीच्या आणखी आठ महिलांची देखील आरोपी महिलांनी अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे समजले. यावरून महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.