Bhosari

मोशीत भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By PCB Author

September 30, 2018

मोशी, दि. ३० (पीसीबी) – मागून भरधाव वेगाने आलेल्या एका कंटेनरने दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२९) दुपारी सव्वाएकच्या सुमारास मोशीतील पुणे-नाशिक महामार्गावरील शोभा कलेक्शन समोर घडली.

राजाराम पुंडलिक घुगरे (वय ४४, रा. रिध्दी-सिध्दी बिल्डिंग, फ्लॅट क्र.बी/१०३, स्पाईन सिटी मॉलसमोर, मोशी प्राधिकरण) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मोठा भाऊ संजय पुंडलिक घुगरे (वय ४६, रा. रिध्दी-सिध्दी बिल्डिंग, फ्लॅट क्र.बी/१०३, स्पाईन सिटी मॉलसमोर, मोशी प्राधिकरण ) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास फिर्यादी संजय यांचा लहान भाऊ राजाराम हे त्यांच्या दुचाकीवरुन मोशीतील पुणे-नाशिक महामार्गावरील शोभा कलेक्शन समोरील रस्त्यातवरुन कामाला जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये राजाराम यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर कंटेनरचालक कंटेनरसह फरार झाला. पोलीसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस आरोपी कंटेनरचालकाचा शोध घेत आहेत.