मोशीत तरुणाला देशी बनावटीची पिस्टल आणि चार जिवंत काडतूसांसह अटक

0
1524

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला भोसरी एमआयडीसी पोलीसांनी देशी बनावटीची पिस्टल आणि चार जिवंत काडतूसांसह अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार (दि.२) मोशी टोलनाक्याजवळील इंद्रायणी हॉटेल समोरील रस्त्यावर करण्यात आली.

मोहन सुभाष कोळी (वय २१, रा. सिध्दी आर्केडपाठीमागे, माणिक चौक, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरुध्द भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील  पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ पोटे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती कि, मोशी टोलनाक्याजवळ एक इसम पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे. यावर पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे यांनी त्यांच्या स्टाफसह मोशी टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपी मोहन कोळी याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीची पिस्टल आणि चार जिवंत काडतूसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करुन कोळी याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे अधिक तपास करत आहेत.