मोशीत कोयत्याचा धाक दाखवून पादचाऱ्याला लुटले

0
811

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – मित्रासोबत जेवण करुन पायी घरी निघालेल्या एका तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या जवळील ३६ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, पाकीट आणि रोख १५ हजार असा एकूण ५१ हजार ५० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना मोशी सस्तेवाडी येथील हॉटेल स्वराज्य समोरील बीआरटी रस्त्यावर घडली.

स्वप्निल भानुदास भगत (वय २६, रा. हरीश सस्ते यांच्या खोलीत, हवालदार वस्ती, मोशी. मु.रा. श्रीरामपुर, अहमदनगर) असे लुटमार झालेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीवरील अज्ञात तिन इसमांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल हा त्याच्या मित्रासोबत मोशी सस्तेवाडी येथील हॉटेल स्वराज्यमध्ये जेवायला गेला होता. जेवण झाल्यावर स्वप्निल पायी घरी निघाला होता. इतक्यात मागून एका दुचाकीवरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी स्वप्निल याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या जवळील ३६ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, पाकीट आणि रोख १५ हजार असा एकूण ५१ हजार ५० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आर.बी.बांबळे तपास करत आहेत.