मोशीतून अटक करण्यात आलेल्या ‘त्या’ आरोपीकडून एकूण ७ देशी पिस्टल आणि २७ जिवंत काडतुसे जप्त

0
1587

मोशी, दि. २२ (पीसीबी) – मोशी येथील मार्केट यार्ड चौकात पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीकडून गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलीस पथकाने सुरुवातीला दोन पिस्टल आणि अकरा जीवंत काडतुसे जप्त केली होती. मात्र पोलीसांनी त्याची कसून चौकशी केल्या नंतर त्याच्याकडून आणखी पाच देशी बनावटीच्या पिस्टल आणि १६ जिवंत काडतुसे आढळून आली. आरोपीकडून असे २ लाख २९ हजार रुपये किमतीच्या तब्बल ७ गावठी पिस्टल आणि २६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

योगेश बाजीराव दौंडकर (वय ३५, रा. मारुती मंदिराजवळ, शेल पिंपळगाव, ता.खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२०) गुन्हे शाखा युनिट २ चे पथक चिखली पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, एका काळ्याच्या रंगाच्या दुचाकीवरुन एक इसम मोशी येथील जुना जकातनाका मार्केटयार्ड येथे गावठी पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. यावर युनिट २ च्या पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी योगेश दौंडकर याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतील असता त्याच्याकडे एक देशी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलीसांनी त्याची मोपेड (क्र. एमएच/१४/डीआर/९३२२) या दुचाकीची  झडती घेतली असता त्याच्या दुचाकीतील डीकीमध्ये लाल रंगाच्या पिशवीत एक गावठी पिस्टल आणि ६ जिवंत काडतुसे आढळून आली. आरोपीकडून असे एकूण २ देशी पिस्टल आणि अकरा जिवंत काडतुसे आढळून आली. पोलीसांनी ती जप्त करुन योगेश याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या चांदुस कोरेगाव येथील फार्म हाऊसमध्ये आणखी पाच देशी बनावटीच्या पिस्टल आणि १६ जिवंत काडतुसे लपून ठेवल्याचे सांगितले. पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन तो ऐवज जप्त केला. असा एकूण २ लाख २९ हजार रुपये किमतीच्या ७ गावठी पिस्टल आणि २६ जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे करत आहेत.