Banner News

मोरवाडीतील डेटा सायन्स इन्स्टिट्यूटचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचे हस्ते उद्घाटन

By PCB Author

January 20, 2019

पिंपरी, दि. २० (पीसीबी) –  मोरवाडी येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या इन्स्टिट्यूटचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर तसेच विद्यापीठातील इंटरनॅशनल सेंटरचे संचालक प्रा. डॉ. विजय खरे यांच्या हस्ते शनिवारी (दि.१९ ) उद्घाटन करण्यात  आले.

याप्रसंगी महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार,  पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकारणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे,  उद्योजक शंकर जगताप,  पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर, सुवर्णा कामतेकर,  पीसीबीचे व्यवस्थापकीय संचालक समर कामतेकर, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, प्रियांका बोरसे, नगरसेवक नवनाथ जगताप, नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, विद्यापीठ सिनेट प्रतिनिधी संतोष ढोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, चेतन घुले, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्राधिकारणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके आदी उपस्थित होते.

डेटा सायन्स आणि डेटा अॅनालिस्टचे विविध प्रशिक्षण देणारी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील ही एकमेवर इन्स्टिट्यूट  आहे. या संस्थेच्या  माध्यमातून विद्यार्थ्यांना डेटा सायन्सचे अद्यावत प्रशिक्षण घेण्याची संधी शहरात उपलब्ध झाली आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू  नितीन करमळकर यांनी यावेळी व्यक्त केले.

सानिकाने अमेरिकेत शिक्षण घेऊन पिंपरी- चिंचवडमध्ये डेटा सायन्सचे प्रशिक्षण देणारी इन्स्टिट्यूट सुरू करणे, ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे. याचा शहरातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. भविष्यात या संस्थेचा मायक्रोसॉफ्ट कंपनीसारखा विस्तार होवो, अशा शुभेच्छा उद्योजक शंकर जगताप यांनी दिल्या.

माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या की, सारंग कामतेकर यांनी सानिकाला नुसतेच अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवले नाही, तर तिला स्वत:च्या पायावर उभे केले आहे. सध्याच्या युगात मुलींचे केवळ लग्न लावून देण्यापेक्षा तिचे करिअर विकसित करणे गरजेचे आहे. असेच मुलीच्या पाठीशी आईवडिलांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. आयुष्यात प्रत्येक दिवस शिकण्यासारखा असतो. शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, असे त्या म्हणाल्या.  यावेळी अनुराधा गोरखे, प्रियांका बोरसे, आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सानिका यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर, प्रा. संतोष पाचपुते यांनी केले. तर आभार संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सानिका कामतेकर यांनी केले.