Chinchwad

मोरया गोसावी माघी पालखी यात्रेदरम्यान जखमी भक्ताच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

By PCB Author

February 15, 2019

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – चिंचवड गावचे ग्रामदैवत महासाधू श्री मोरया गोसावी यांची चिंचवड ते मोरगाव या माघी पालखी यात्रेदरम्यान झालेल्या अपघातात शरद पुराणिक यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. मेंदूला दुखापत झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपचार खर्चासाठी समाजातील दानशूरांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

मोरया गोसावी मंदिर ते मोरगाव दरम्यान माघी पालखी जाते. यंदाही चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने माघी पालखी चिंचवड मोरगावकडे प्रस्थान झाली. त्यात अनेक मोरया भक्त सहभागी झाले होते. पण ७ फेब्रुवारी रोजी जेजुरीहून मोरगावकडे पालखी जात असताना सायंकाळी सातच्या सुमारास पायी चालणाऱ्या दोन मोरया भक्तांना एका दुचाकी वाहनाने मोरगाव रस्त्यावर ढोले मळा येथे जोरदार धडक दिली. त्यामध्ये शरद पुराणिक व मिलिंद पोफळे हे दोन मोरया भक्त जखमी झाले. शरद पुराणिक यांच्या डोक्याला जबर मार लागला असून पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्या मेंदूवर शत्रक्रिया करण्यात आली.

आता अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावरचा उपचाराचा खर्च सध्या त्यांचे नातेवाईक करत  आहेत. परंतु, होणारा खर्च मोठा असल्याने त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा तो पेलवणारा नाही. तसेच पुराणिक यांच्या कुटुंबियांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे मोरया भक्त शरद पुराणिक यांच्यावर उपचाराचा खर्च करण्यासाठी समाजातील दानशूरांनी आर्थिक मदत करावी. त्यासाठी योगेश  पुराणिक (9822697781) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन पुराणिक कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.