मोबाईलवर मिळणार हार्टअॅटॅकची पूर्वसूचना

0
874

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – हृदयविकारांना आमंत्रण देणारे यंत्र म्हणून मोबाइलची ओळख. मात्र हाच मोबाइल आता आपल्याला हृदयविकारांची पूर्वसूचना देणार आहे. आयआयटी मुंबईतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनात यासाठी एक सेन्सर बनवण्यात आला आहे. तो मोबाइलला जोडला, की तुमच्या रक्तातील रासायनिक बदलांपासून ते हृदयाच्या ठोक्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे.

एखाद्या व्यक्तीला हार्ट अॅटॅक येत असेल किंवा कोणताही हृदय विकार होत असेल, तर त्याची पूर्वसूचना देण्याचे महत्त्वपूर्ण काम हे उपकरण करणार आहे. तसेच या उपकरणाच्या माध्यमातून तातडीने तुमचा ‘ईसीजी’ घेता येऊ शकतो; तसेच वैद्यकीय सहाय्यकांकडे याचा तपशील जाऊन तुम्हाला तत्काळ मदतही मिळू शकते. आज देशात हार्टअॅटॅकने मृत्यू होणाऱ्यांच्या प्रमाणात सतत वाढ होत आहे. यामुळे अशा उपकरणाच्या माध्यमातून ते रोखण्यास मदत होऊ शकणार आहे. हे उपकरण देबास्मिता मोंडल आणि सौरभ अग्रवाल या विद्यार्थ्यांनी प्रा. सौम्य मुखर्जी या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विषयाच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले आहे. त्यांच्या या उपकरणाला ‘गांधीयन यंग टेक्नॉलॉजी इनोव्हेशन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून आपल्या शरीरातील मिओग्लोबिन आणि मियेलोप्रोक्साइड या दोन रसायनांवर लक्ष ठेवले जाते.

मिओग्लोबिनच्या माध्यमातून मायोकार्डिकल इन्फ्रॅक्शनच्या वेळी रक्तातून लोह आणि प्रथिने बाहेर पडतात, यावर लक्ष ठेवले जाते. या इन्फ्रॅक्शनमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन हार्टअॅटॅक येतो. यामुळे जर ही प्रक्रिया होतानाच धोक्याची सूचना किंवा संकेत (अलर्ट) आल्यास तातडीने मदत मिळाल्यास एखाद्याचे प्राण वाचू शकतात. याचबरोबर मियेलोप्रोक्साइडच्या माध्यमातून रक्तातून पांढऱ्या पेशी किती प्रमाणात व कशा पद्धतीने बाहेर पडतात, याकडे लक्ष ठेवले जाते. या रासायनिक प्रक्रियेमुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ शकतात. यामुळे याची पूर्वसूचनाही या उपकरणाच्या माध्यमातून दिली जाते.