Others

“मोदी सरकार देशाचे रक्षण करण्यास पुन्हा एकदा असमर्थ”: राहूल गांधींचा घणाघात

By PCB Author

November 14, 2021

नवी दिल्ली, दि.१४ (पीसीबी) : मणिपूरमध्ये शनिवारी सकाळी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी आणि चार जवान शहीद झाले. या हल्ल्यात कर्नल त्रिपाठी यांची पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला. या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी या देशाचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याचं या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झालंय, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

“मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मोदी सरकार देशाचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शहीद जवानांप्रती आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. देश तुमचे बलिदान लक्षात ठेवेल,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

मणिपुर में सेना के क़ाफ़िले पर हुए आतंकी हमले से एक बार फिर साबित होता है कि मोदी सरकार राष्ट्र की सुरक्षा करने में असमर्थ है।

शहीदों को मेरी श्रद्धांजलि व उनके परिवारजनों को शोक संवेदनाएँ। देश आपके बलिदान को याद रखेगा।

— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 13, 2021

४६ आसाम रायफल्सच्या खुगा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी शनिवारी सकाळी एका लष्करी छावणीवर गेले होते. तेथून परतताना सकाळी १०च्या सुमारास संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर म्यानमार सीमेजवळच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील शेखन गावानजीक हल्ला केला. दहशतवाद्यांनी ‘आयईडी’ स्फोट घडवून आणल्यानंतर बेछूट गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल ‘आसाम रायफल्स’च्या जवानांनीही गोळीबार केला. या वेळी झालेल्या धुमश्चक्रीत कमांडिंग ऑफिसर कर्नल त्रिपाठी (४१), त्यांची पत्नी अनुजा (३६) आणि सहा वर्षांचा मुलगा अबीर यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर चार जवानही दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत.