Maharashtra

मोदी सरकार उपक्रम आणि योजनातून पं. दीनदयाळ उपाध्यायजीना विनम्र अभिवादन करीत आहेत – विनोद तावडे

By PCB Author

September 25, 2020

मुंबई,दि.२५(पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केंद्र सरकार शासनाच्या माध्यमातून पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांवर आधारित विविध उपक्रम चालवत असून त्यातूनच ते दीनदयाळजीना खऱ्या अर्थाने विनम्र अभिवादन करीत आहेत. पं. दीनदयाळजींच्या 104 व्या जयंती निमित्त भाजपा अहमदनगर जिल्ह्यामार्फत आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री श्री. विनोद तावडे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. भारतीय जनता पक्षातर्फे 25 सप्टेंबर – दीनदयाळ उपाध्याय जयंती ते २ ऑक्टोबर – गांधी जयंती या कालावधीत आत्मनिर्भर अभियान राबवत असून अहमदनगर जिल्ह्यातील या अभियानाचा प्रारंभ श्री. तावडे यांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी माजी मंत्री राम शिंदे, माजी खासदार दिलीप गांधी, माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष भैया गंधे, महापौर, उपमहापौर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पं. दीनदयाळजी यांनी मांडलेला अंत्योदय व समाजातील शेवटच्या माणसाचा विकास हाच खरा देशाचा विकास ही संकल्पना मोदी सरकारने रस्ते, वीज, पाणी, Gas हे गरीबातील गरीब माणसाला पोहोचवून प्रत्यक्षात आणली आहे. दीनदयाळजीनी मांडलेला स्वदेशी म्हणजे केवळ विदेशीचा बहिष्कार नसून आपल्या देशातील शेतकरी, शेतमजूर, मजूर, उद्यमी, यांना आत्मनिर्भर करणे असे आहे आणि ते मोदी सरकारच्या माध्यमातून सुरु झाले आहे. स्वदेशीमध्ये स्वभाषा, स्वशिक्षण हे सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून प्रत्यक्षात अंमलात आणण्यात येत आहे. भारतातील उद्योगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी व्होकल फॉर लोकल – लोकल फॉर ग्लोबल आणि प्रोड्यूस फॉर वर्ल्ड या त्रिसूत्रीचा खरा अर्थ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे, असे आवाहन श्री. तावडे यांनी या प्रसंगी केले.

शेतकऱ्यांविषयी संसदेत पारित करण्यात आलेल्या तीन विधेयकावरून विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते व माजी कृषी मंत्री यांनी या विधेयकाबाबत राज्यसभेत स्वतः जाऊन बोलणं गरजेचं होतं. किवा त्यांच्या खासदारांमार्फत ठोस भूमिका संसदेत घ्यायला हवी होती. पण दुर्दैवाने पवार साहेबांनी असे केले नाही. राज्यसभेतील गोंधळ घातलेल्या निलंबित खासदारांच्या सहानुभूतीसाठी अन्न त्याग करणं हे तर न कळण्यासारखे आहे. खरंतर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर जर पवार साहेबांनी अन्न त्याग केला असता तर मराठा समाजाला बरे वाटले असते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर लगेचच दोन दिवसामध्ये महाआघाडी सरकारने १८ पोलिसांच्या भरतीचा आदेश काढला यातून महाआघाडी सरकारला मराठा समाजाला डावलायचे असल्याचे ध्यानात येते. पं. दीन दयाळ उपाध्याय यांच्या जीवनातील साधी राहणी, तळागाळातील घटकांशी सतत जोडून राहणे, आपला देश आपला समाज यासाठी कार्यरत राहणे, असे विविध पैलू असून ते सर्व कार्यकर्त्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे, असेही प्रतिपादन श्री. तावडे यांनी याप्रसंगी केले.