मोदी सरकारमधील सर्व मंत्री दहशतीखाली; माजी मंत्री उपेंद्र कुशवाहांचा गौप्यस्फोट

0
1213

पुणे, दि. १३ (पीसीबी)  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य  दिलेले नाही. तर सर्व निर्णय पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून  (पीएमओ) घेतले जातात.  मोदी सरकारमधील सर्व मंत्री किती दहशतीखाली असतात, याचा मला आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही अनुभव आला आहे, असा गौप्यस्फोट   माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी केला आहे.  

पुण्यात आयोजित  पत्रकार परिषदेत कुशवाह बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उपस्थित होते.

कुशवाह यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा नुकताच  राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले की, विकासाचा अजेंडा दाखवून मोदींनी आम्हाला भुलवले होते, मात्र त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यास सुरवात केली. त्यांच्याकडून आता कोणतीही आशा राहिलेली नाही. त्यामुळे एनडीएच्या विरोधात महाआघाडीत सामील होणे किंवा स्वतंत्रपणे लढणे या पर्यायांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,  छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, कुशवाह यांनी २०१३ मध्ये  राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाची स्थापना केली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांनी काही दिवसापूर्वीच एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. त्यांचे छगन भुजबळ यांच्याशी चांगले संबंध आहेत .