मोदी सरकारची मुदत संपत आली आहे – ममता बॅनर्जी

0
673

कोलकता, दि. १९ (पीसीबी) –  ज्याप्रमाणे औषधांची मुदत संपत येते, त्याप्रमाणे मोदी सरकारची मुदत संपत आली आहे. आता मोदी सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका तृणमूल काँग्रेसच्या  नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शनिवार) येथे केली.

केंद्रातील मोदी सरकार विरोधात आयोजित केलेल्या सभेत तब्बल २२ पक्षांनी हजेरी लावत विरोधकांची एकजूट दाखवली. यावेळी ममता बॅनर्जी बोलत होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारविरोधात  जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या संयुक्त सभेत प्रमुख विरोधी नेत्यांसह माजी पंतप्रधान, तीन मुख्यमंत्री, तीन माजी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हाही सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनीच मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

तीन राज्यात भाजपच्या झालेल्या पराभवाच्या वर्मावर बोट ठेवत ममता म्हणाल्या, मोदी सरकारच्या काळात जनतेला अच्छे दिन आलेले नाहीत. त्यामुळे एक एक करून भाजपला सर्व राज्यातून हद्दपार करायचे आहे. भाजपला घरी बसवण्याचा निर्धार देशातील जनतेने केला आहे. तसेच रथयात्रेच्या नावाखाली राज्यात दंगली घालू देणार नाही, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी यावेळी दिला.