मोदी, शहांचा आता एकनाथ शिंदेंबाबत मोठा अपेक्षाभंग

0
243

पुणे, दि. १६ (पीसीबी) : शिवसेनेशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार पक्षातून बाहेर पडले. मात्र, सर्वसामान्य शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्याबरोबर राहिले, त्यामुळेच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व जनतेची सहानुभूती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा अपेक्षाभंग झाला आहे, अशी टीका शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी केली.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके हे दौंड तालुक्यात एका खाजगी कार्यक्रमानिमित्तआले होते. त्या वेळी त्यांनी सरकारनामाशी बोलताना वरील गौप्यस्फोट केला. हाके म्हणाले की, सुमारे पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेशी गद्दारी करून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यात सत्तेेवर आले आहे. राज्यातील तरुणांना रोजगार, महिलाची सुरक्षा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणे, पीकविमा, सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील उद्योग गुजरात व इतर राज्यात गेल्याने हजारो तरुणाच्या रोजगाराची संधी गेल्याने अपयशी ठरले आहे.

राज्यातील मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यमंत्री व मंत्री राज्यात सत्कार घेण्यात व राजकीय विरोधकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानत आहेत हे दुर्दैवी आहे. राज्यात सत्तांतर होऊनही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा व आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून एकनाथ शिंदेबाबत मोदी व शहांचा अपेक्षाभंग झाला आहे, असा दावाही हाके यांनी या वेळी बोलताना केला.