“मोदी, योगींना महिलांबाबत संवेदना नाही”- गिरीजा कुदळे शहर महिला कॉंग्रेसचे हाथरस घटनेबाबत पोस्टकार्ड अभियान

0
234

पिंपरी,दि.19(पीसीबी) – उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामुहिक बलात्काराच्या घटनेस एक महिना झाला तरी याबाबत एकही शब्द न बोलणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना महिलांवर होणा-या अन्याय अत्याचाराबाबत थोडीही संवेदना नाही. या घटनेतील पिडीत तरुणीच्या मृतदेहावर तिच्या नातेवाईकांच्या परस्पर रात्रीमध्ये पोलीस प्रशासनाने अंत्यसंस्कार केले. हि बाब म्हणजे मानवी हक्कांची पायमल्ली आहे. असा दुर्दैवी प्रसंग देशात आतापर्यंत कधी घडला नाही अशी टिका पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी केली.

हाथरस घटनेबाबत उत्तर प्रदेश सरकारचा व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस खा. राहुल गांधी, खा. प्रियांका गांधी, महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुष्मिता देव, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पिडीत महिलांना बदनाम करणे भाजपाने थांबवावे’ हे पोस्टकार्ड अभियान राबविले. या अभियानाअंतर्गत सोमवारी (दि. 19 ऑक्टोबर) शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना पाच हजार पोस्टकार्ड पाठविण्यात आले. यामध्ये ‘पिडीत महिलेला न्याय पाहिजे, बदनामी नाही’. असा मजकूर आहे. चिंचवड स्टेशन, पोस्ट ऑफीस येथे झालेल्या या कार्यक्रमास कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, मीनाताई गायकवाड, हुरबानो शेख, सुनिता कामथे, वैशाली कुदळे, विजया लोणी आदी उपस्थित होते.

गिरीजा कुदळे म्हणाल्या की, डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच्या काळात अशा घटनांबाबत वेळोवेळी रस्त्यांवर येऊन आंदोलन करणा-या व तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठविणा-या स्मृती इराणी अजुनही गप्प का आहेत? असा प्रश्न कुदळे यांनी उपस्थित केला. हे अभियान पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात राबविले. यामध्ये महिलांनी घरोघरी जाऊन पोस्टकार्ड लिहून घेतले. यावेळी भाजपाच्या व मुख्यमंत्री योगी यांच्या कार्यप्रणालीबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या घटनेबाबत सर्व थरातील महिलांमध्ये तीव्र रोष आहे असे कुदळे म्हणाल्या.